मुंबई ः अंधेरी येथील चित्रकूट टर्फवर रंगलेल्या 'टॅक्स सही है प्रीमियर लीग (टीपीएल) - सिझन ३' इनडोअर क्रिकेट स्पर्धेची अखेर अत्यंत दणदणीत झाली. अंतिम सामन्यात अनुभवी वियोम फाउंडेशनने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (बीएमसी) तब्बल १२४ धावांनी एकतर्फी पराभव करत विजेतेपदावर दिमाखात नाव कोरले.

संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या वियोम फाउंडेशनचा कर्णधार ओमकार पाटोळे याला 'स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू' म्हणून गौरवण्यात आले. एमजीए फाउंडेशन आयोजित आणि महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेखाली ही स्पर्धा पार पडली.

ओमकारने बदलले सामन्याचे चित्र!
अंतिम लढतीत बीएमसीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बीएमसीच्या रुपेश चुनेकर आणि ऋषीकेश जाधव यांनी सुरुवातीला अप्रतिम गोलंदाजी करत वियोमच्या श्रेयसला तीन वेळा बाद केले. त्यामुळे पहिल्या जोडीला दोन षटकात केवळ ४ धावा करता आल्या. मात्र, या संकटसमयी कर्णधार ओमकार पाटोळेने मैदानावर उतरून आक्रमक फलंदाजी करत २० धावांची खेळी साकारली आणि डाव सावरला. त्यानंतर अश्विन डोंगरे आणि प्रसाद आंब्रे यांनी २९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अखेरीस अनिकेत माडीये आणि रोहित खरात यांनी तुफानी फटकेबाजी करत २६ धावा जोडल्यामुळे वियोम फाउंडेशनने ७९ धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभारला.

वियोमचा विक्रमी विजय
७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बीएमसीच्या फलंदाजांनी पार संयम गमावला. वियोम फाउंडेशनच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर बीएमसीचे फलंदाज तब्बल १७ वेळा बाद झाले. परिणामी, इनडोअर क्रिकेटच्या नियमांनुसार त्यांच्या खात्यात वजा ४५ (-४५) धावा जमा झाल्या आणि वियोम फाउंडेशनने १२४ धावांच्या विक्रमी फरकाने ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. वियोम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर यांनी खेळाडूंच्या सांघिक कामगिरीचे कौतुक केले.

ओमकार पाटोळे ठरला 'सुपरस्टार'
नेतृत्व, फलंदाजी आणि संघबांधणी या तिन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करणाऱ्या ओमकार पाटोळेला ‘मोहसिन खान’च्या स्वाक्षरीची बॅट देऊन सन्मानित करण्यात आले. साखळी फेरीतही ओमकारच्या नेतृत्वाखाली संघाने प्रत्येक सामन्यात १०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार समारोप
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ॲड. अमित मेहता आणि आमदार हरून खान यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ॲड. राजनारायण यादव, ॲड. अवनीश तीर्थराज सिंग, मनीष अग्रवाल (अध्यक्ष, एमजीए फाउंडेशन), बाळ तोरसकर (संस्थापक सचिव, महामुंबई इनडोअर क्रिकेट), महिमा अग्रवाल, विनया तोरसकर, प्रमोद पतोडीया, पुरुषोत्तम यादव आणि स्नेहा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नीता, श्वेता, दक्ष, आकाश मेहता आणि संपूर्ण एमजीए संघाने परिश्रम घेतले. या स्पर्धेला आसा ॲब्लॉय, आरडीसी काँक्रिट, एयू बँक आणि अँड्रोमेडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.