छत्रपती संभाजीनगर ः औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची (एडीसीए) नवीन कार्यकारिणी निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित सचिव शिरीष बोराळकर यांनी एडीसीए मैदानावर खेळाडू, प्रशिक्षक आणि विविध स्पर्धा आयोजक यांच्याशी संवाद साधला.

एडीसीए संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणतीही समिती स्थापन करण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व घटकांना आमंत्रित करून त्यांच्याकडून सूचना व मागण्या मागवण्यात आल्या आहेत. या बैठकीत प्रामुख्याने खेळाडूंची निवड प्रक्रिया, मैदानाची स्थिती आणि पायाभूत सुविधांवर सविस्तर चर्चा झाली.

खेळपट्ट्या आणि आउटफिल्ड सुधारण्यावर भर
बैठकीत रणजी ट्रॉफी किंवा इतर मोठ्या सामन्यांच्या आयोजनासाठी मैदानाची स्थिती सुधारण्यावर विशेष चर्चा झाली. बीसीसीआयच्या नियमांनुसार, सामन्यापूर्वी तीन दिवस आधी क्युरेटर खेळपट्टी आणि मैदानाची तपासणी करण्यासाठी येतात. मागच्या वेळेस तपासणी दरम्यान मैदानावरील आउटफिल्डवर अनेक खड्डे असल्याचे समोर आले होते. त्यामुळे जून महिन्यात पाऊस पडण्यापूर्वीच खेळपट्ट्या आणि आउटफिल्ड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे लागेल, जेणेकरून ऑक्टोबरपर्यंत मैदान सामन्यांसाठी सज्ज होईल.

निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि 'फिटनेस कॅम्प'
प्रशिक्षकांनी प्रामुख्याने निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली. त्यानुसार, आता संघ निवडीची प्रक्रिया ऐनवेळी न करता जून महिन्यातच १४, १६, १९, २३ वर्षांखालील आणि वरिष्ठ मुला-मुलींच्या गटातून प्रत्येकी १५ ते २० खेळाडूंची निवड केली जाईल. बीसीसीआयच्या धर्तीवर या खेळाडूंचा ६ महिने आधीच फिटनेस आणि सराव कॅम्प सुरू होईल, ज्यामुळे खेळाडूंचा परफॉर्मन्स सुधारेल आणि त्यांच्यात चांगला ताळमेळ निर्माण होईल असे मत वरिष्ठ खेळाडू आणि खेळाडू विकास परिवर्तन पॅनलचे समन्वयक दिनेश कुंटे यांनी व्यक्त केले.

अकॅडमी आणि प्रशिक्षकांच्या मुख्य मागण्या

बैठकीत शहरातील नामांकित क्रिकेट अकॅडमीचे कोचेस उपस्थित होते. त्यांनी प्रामुख्याने विविध मागण्या या बैठकीत मांडल्या.

१. पारदर्शक निवड प्रक्रिया : जिल्हा संघ निवडीत खेळाडूंच्या गुणवत्तेला प्राधान्य मिळावे.

२. मैदानांचा दर्जा : दर्जेदार खेळपट्ट्या आणि सरावासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे.

३. एडीसीएशी संलग्नता : प्रत्येक खेळाडू आणि अकॅडमीचे एडीसीए अंतर्गत अधिकृत रजिस्ट्रेशन करणे.

या बैठकीला एडीसीएचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष उमेश डबरी, सहसचिव करण डोग्रा, कोषाध्यक्ष अनिल इरावणे, कार्यकारिणी सदस्य निखिल मिटकर, सुधीर भालेराव, हेमंत मुळे, आजीव सभासद मोहन बोंबले, विशाल पांडे, अरुण गुदगे, दिनेश कुंटे, अनंत नेरळकर, कर्मवीर लव्हेरा, प्रभूलाल पटेल, राहुल टेकाळे, मिलिंद पाटील, प्रीतेश मुद्रका, प्रदीप जगदाळे, रफिक शेख, सारिका देशपांडे, दीपक पाटील, जगदीश पटेल, शाकीर राजा, विशाल गिते, सय्यद जमशीद, शमीम, उदय बक्षी यांच्यासह अनेक आजी-माजी खेळाडू आणि प्रशिक्षक उपस्थित होते. मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांवर पुढील ८ दिवसांत अंतिम प्लॅनिंग करून काम सुरू केले जाईल, असे नवनियुक्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.