छत्रपती संभाजीनगर ः औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचा (एडीसीए) प्रदीर्घ कायदेशीर लढा अखेर संपुष्टात आला असून, नवनियुक्त अध्यक्ष आणि त्यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे क्रिकेट वर्तुळात स्वागत होत आहे. संघटनेचे सन १९७३ पासूनचे ज्येष्ठ आजीव सदस्य किरण जोशी (वय ७१) यांनी नवनियुक्त अध्यक्ष अतुल सावे आणि त्यांच्या टीमच्या आगामी 'व्हिजन डॉक्युमेंट'साठी तसेच जिल्हा क्रिकेटच्या पुनरुज्जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना व मागण्या मांडल्या आहेत.
क्रिकेटच्या विकासासाठी १० महत्त्वाच्या शिफारसी
आधुनिक अकॅडमी व स्पर्धांचे आयोजन
एडीसीए संघटनेच्या वतीने १० ते १९ वर्षांखालील मुलांसाठी एक पूर्णवेळ 'कोचिंग अकॅडमी' सुरू करण्यात यावी. तसेच १४, १६ आणि १९ वर्षांखालील वयोगटासाठी नियमित लीग मॅचेस, आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन आणि औद्योगिक क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू कराव्यात.
पारदर्शक निवड प्रक्रिया व पायाभूत सुविधा
राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या औरंगाबाद जिल्हा संघाच्या निवडीसाठी पूर्णपणे निष्पक्ष आणि गुणवत्तेवर आधारित निवड समिती असावी. तसेच क्रिकेटच्या विकासासाठी मिळालेल्या मैदानाचा वापर केवळ उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीच व्हावा.
घटनादुरुस्ती आणि आजीव सदस्यांचा सन्मान
संघटनेचे कार्यालय लाभलेले दिवंगत सुभाष लोळगे, जे. यू. मिटकर आणि गजानन धांडे यांचे छायाचित्र कार्यालयात लावण्यात यावे. संघटनेची घटना अत्यंत जुनी (१९७३ ची) असून, त्यात तातडीने बदल करणे हे नव्या समितीचे पहिले कर्तव्य असावे. यासोबतच, निवृत्तीनंतर राज्य व देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना संघटनेचे सदस्यत्व बहाल करावे.
संवादाची गरज
कार्यकारी समितीने कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आजीव सदस्यांची बैठक घेऊन नियमित फीडबॅक घ्यावा. आजीव सदस्यांची केवळ १८ वर्षांनंतर आठवण न काढता त्यांना वारंवार प्रक्रियेत सामील करून घ्यावे.
"स्वार्थ बाजूला ठेवून क्रिकेटला नेहमी प्रथम प्राधान्य द्यावे. नवनियुक्त अध्यक्षांच्या नेतृत्वात औरंगाबादच्या क्रिकेटला त्याचे वैभव नक्कीच परत मिळेल," असा विश्वास व्यक्त करत किरण जोशी यांनी नवनिर्वाचित मंडळाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.