प्रेम पंडीत
मुंबई ः भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी आणखी एक सुवर्णक्षण उजाडला आहे. 'दुसऱ्या चोला चेस जीएम नॉर्म राउंड रॉबिन' स्पर्धेत चमकदार कामगिरी करत हर्षवर्धन जी. बी. भारताचा ९७ वा ग्रँडमास्टर बनला आहे. इथन वाझ भारताचा ९६ वा ग्रँडमास्टर बनला होता, त्यानंतर लगेचच हर्षवर्धनने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
स्पर्धेत ९ पैकी ६.५ गुणांची आवश्यकता असताना हर्षवर्धन संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिला. पहिल्या ५ फेऱ्यांत ३ गुण मिळवल्यानंतर, अंतिम ४ डावांत त्याने अत्यंत चुरशीच्या लढती जिंकल्या. ६ व्या फेरीत आयएम कुशाग्र मोहन, ७ व्या फेरीत अव्वल स्थानावरील जीएम मिचेल क्रासेनकोव्ह आणि ८ व्या फेरीत अलेक्सी फेडोरोव्हचा पराभव करून त्याने ग्रँडमास्टर बनण्यासाठी आवश्यक असलेला 'नॉर्म' मिळवला आणि २५०० रेटिंगचा टप्पाही पार केला. अंतिम फेरीत मिहाई निकिटेन्कोविरुद्ध डाव बरोबरीत सोडवत त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
हर्षवर्धनने २०२२ मधील आशियाई ज्युनियर स्पर्धेत पहिला आणि २०२५ मधील आशियाई कॉन्टिनेंटल स्पर्धेत दुसरा जीएम नॉर्म मिळवून फिडे वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवली होती. वडील एफटी गोपाळकृष्णन यांच्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणाऱ्या हर्षवर्धनला सध्या ग्रँडमास्टर दीपन चक्रवर्ती आणि यापूर्वी विश्वेश्वरन कामेश्वरन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल देशभरातून कौतुक होत आहे.