मुंबई-विरार ः पालघर जिल्ह्यातील अर्नाळा-विरार येथे २७ आणि २८ जून रोजी राष्ट्रीय योंगमुडो पंच प्रशिक्षण आणि पंच परीक्षा अत्यंत उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून योंगमुडोचे खेळाडू आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या परीक्षेचे नियोजन व मार्गदर्शन भारतीय योंगमुडो संघटनेचे अध्यक्ष रोहित नारकर आणि स्पर्धा अधीक्षक बाशा सर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रसंगी महाराष्ट्र योंगमुडो संघटनेचे अध्यक्ष बाबुराव खंदारे आणि सचिव नागेश शेट्टीकर यांनी उपस्थितांना तांत्रिक नियमांचे मार्गदर्शन केले.

या राष्ट्रीय पंच परीक्षेत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या प्रतिनिधींनी यशस्वीपणे परीक्षा दिली. त्यात पालघरचे जिल्हा सचिव परेश राऊत, छत्रपती संभाजीनगरचे अनंत सोनुले, नांदेडचे खंडू चव्हाण, हिंगोलीचे अरुण दीपके, सोलापूरचे विवेक मिस्कीन, मुंबईचे महेश सिंग, परभणीचे ऋषिकेश मुदकळकर, नाशिकचे रमेश भडांगे, जळगावचे प्रवीण राव, अमरावतीच्या शुभांगी रावत या पदाधिकाऱयांचा समावेश आहे.

या नवीन पंचांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील योंगमुडो खेळाच्या तांत्रिक रचनेला आणि स्पर्धा आयोजनाला मोठी मदत मिळणार असून, सर्व उत्तीर्ण परीक्षकांचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.