ठाणे ः पुण्यातील वारजे येथील हिंदकेसरी योगेश दोडके कुस्ती संकुलात २८ जून रोजी पार पडलेल्या २३ वर्षांखालील वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीत ठाणे जिल्ह्याचा पैलवान विशाल जाधव याने महाराष्ट्र संघात मानाचे स्थान निश्चित केले आहे. विशाल हा मीरा-भाईंदर महानगरपालिका व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित 'श्री गणेश आखाड्या'चा मल्ल आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे खुल्या पद्धतीने आयोजित केलेल्या या चाचणीत ९२ किलो वजनी गटात राज्यभरातून १५ नामांकित कुस्तीपटू सहभागी झाले होते. विशालने पहिल्या फेरीत कोल्हापूरच्या अवधूत अवघडेचा १०-०, दुसऱ्या फेरीत सोलापूरच्या उदयसिंग सोडकरचा १५-९ आणि उपांत्य फेरीत पुण्याच्या निरंजन माझिरेचा १२-८ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात त्याने सांगलीच्या प्रतीक गौंडवर १०-० अशी दणदणीत मात करत सुवर्ण कामगिरी केली.
भाईंदरच्या अभिनव कॉलेजमध्ये कला शाखेच्या अंतिम वर्षात शिकणारा विशाल सध्या 'जाणता राजा कुस्ती केंद्र' येथे सराव करत आहे. आता तो १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत रोहतक (हरियाणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. त्याच्या या यशाबद्दल श्री गणेश आखाड्याच्या वतीने त्याचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.