छत्रपती संभाजीनगर ः पंजाबमधील जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात २६ ते २८ जून दरम्यान आयोजित युवा गटाच्या राष्ट्रीय कॉर्फबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले आहे. या यशात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या 'एमएसएम बास्केटबॉल अकादमी'चे खेळाडू साईराज काष्टे आणि राजवर्धन मोरे यांनी सिंहाचा वाटा उचलला.

अत्यंत चुरशीच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने छत्तीसगडचा ६ विरुद्ध ४ अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात साईराज आणि राजवर्धन यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. यापूर्वी महाराष्ट्र संघाने जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या संघांवर सहज मात करत आगेकूच केली होती. विशेष म्हणजे, याच स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आशियाई आंतरराष्ट्रीय कॉर्फबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार असल्याने या कामगिरीला मोठे महत्त्व आहे.

संघाच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र राज्य कॉर्फबॉल संघटनेचे पदाधिकारी प्रवीण मानवतकर, संघ प्रशिक्षक सचिन वावळे, जिल्हा कॉर्फबॉल संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. उदय डोंगरे आणि सचिव गणेश कडू आदींनी दोन्ही खेळाडूंचे व संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.