पुणे ः पुण्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग प्रशिक्षक दिपाली बारगुजे यांची दक्षिण कोरियात २९ जून ते १३ जुलै या कालावधीत होणाऱ्या प्रतिष्ठित 'यूनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल लेवल २ कोचिंग कोर्स' साठी निवड झाली आहे. जगभरातून निवडक प्रशिक्षकांची निवड होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी भारतातून झालेली त्यांची निवड देशासाठी अभिमानास्पद आहे.
दिपाली बारगुजे यांनी २००७ ते २०१७ दरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलपटू म्हणून चमकदार कामगिरी केली असून, २०१४ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा 'शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार' मिळाला आहे. २०१७ पासून त्यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य सुरू केले आणि 'एनआयएस' कोचिंग डिप्लोमा पूर्ण केला. सध्या त्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात 'खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स' येथे सायकलिंगच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी 'पुणे ग्रँड टूर' सायकलिंग स्पर्धेत मुख्य पंच म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
दक्षिण कोरियातील या कोर्समध्ये आधुनिक प्रशिक्षण पद्धती, क्रीडा विज्ञान आणि अत्याधुनिक सायकलिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांच्या या निवडीबद्दल सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष ॲड. विक्रम रोठे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सीईओ प्रवीण पाटील, सचिव प्रा. संजय साठे आणि जिजामाता पुरस्कार विजेत्या प्रशिक्षिका दिपाली पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.