प्रेम पंडीत
मुंबई ः कांदिवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे संपन्न झालेल्या एच २ ई पॉवर सिस्टीम्स महाराष्ट्र राज्य १७ वर्षांखालील बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत खुल्या गटात मुंबईच्या अभीक भट्टने आणि मुलींच्या गटात पुण्याच्या डब्ल्यूसीएम निहिरा कौल हिने दिमाखदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
खुल्या गटात अभीक भट्टचा झंझावात
मुंबई शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभीक भट्टने स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत सर्वाधिक ७ गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. त्याला ५,००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ठाण्याच्या अर्णव महेश कोळीने ६.५ गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर मुंबई उपनगरच्या कुश अजय अगरवालला ६.५ गुणांसह तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. ठाण्याच्या आग्रवाल श्रावणाने चौथा तर जळगावच्या तासीन रफिक तडवीने पाचवा क्रमांक पटकावला.
मुलींच्या गटात निहिरा कौल अव्वल
मुलींच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या गटात पुण्याच्या निहिरा कौल हिने ६.५ गुणांसह विजेतेपद मिळवून पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तिने ५,००० रुपयांच्या मुख्य बक्षिसावर नाव कोरले. सांगलीच्या श्रिया जी. हिप्पर्गी हिने ६.५ गुणांसह द्वितीय क्रमांक, तर मुंबई उपनगरच्या एएफएम मायशा परवेजने ६.५ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. या गटात जगदाळे ईश्वरी चौथ्या आणि मार्गज प्रीषा पाचव्या स्थानावर राहिली.
उत्कृष्ट आयोजन आणि पंचगिरी
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे करण्यात आले होते. संघटनेचे सचिव विठ्ठल माधव आणि खजिनदार प्रेम पंडित यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुख्य पंच संदेश नगरनाईक यांच्या कुशल नियंत्रणाखाली आणि सहपंच हर्ष पंडित, वैशाली सामंत, योगेश वेळसकर, गणेश हडवले, मधू सावंत, वारिन गडा, कुणाल शेर्लेकर व दिलीप मयेकर यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट रित्या पार पडली. दोन्ही गटांत एकूण ४०,२०० रुपयांच्या रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.