छत्रपती संभाजीनगर ः स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आगामी २७ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स (राष्ट्रकुल स्पर्धा) २०२६ साठी भारतीय ज्युदो संघाची घोषणा झाली आहे. यामध्ये ५२ किलो वजन गटात छत्रपती संभाजीनगरची सुवर्णकन्या श्रद्धा कडूबाळ चोपडे हिची भारतीय संघात निवड झाली असून, या मानाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणारी ती महाराष्ट्र राज्यातील एकमेव खेळाडू आहे. ती तिसगावची रहिवासी असून, बजाजनगर येथील ‘श्रीमती परमेश्वरी देवानी ज्युदो क्लब’ ची खेळाडू आहे.
बजाजनगर ज्युदो क्लबतर्फे जंगी सत्कार
या ऐतिहासिक यशाबद्दल बजाजनगर ज्युदो क्लबच्या वतीने श्रद्धा चोपडे, तिची आई ज्योती चोपडे आणि वडील कडूबाळ चोपडे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन जंगी सत्कार करण्यात आला आणि आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. श्रद्धाला अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक यशपाल सोळंकी, मधुश्री देसाई, भीमराज रहाणे, अशोक जंगमे आणि वडील कडूबाळ चोपडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सध्या ती भोपाळ येथील भारतीय खेळ प्राधिकरण (साई) केंद्रात यशपाल सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहे.
पदकांचा धडाका
श्रद्धाला नुकताच महाराष्ट्राचा मानाचा 'शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. तिची आजवरची कामगिरी अत्यंत चमकदार राहिली असून, तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदके जिंकली आहेत. तर राष्ट्रीय स्तरावर ११ सुवर्ण, ७ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली आहे. गतवर्षीच्या नॅशनल गेम्समध्येही तिने सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
आर्थिक मदतीचे आवाहन
जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करताना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागासाठी श्रद्धाला सध्या आर्थिक मदतीची मोठी गरज भासत आहे. महाराष्ट्रातील एखाद्या चांगल्या उद्योजकाने किंवा प्रायोजकाने (स्पॉन्सर) तिला आर्थिक पाठबळ दिल्यास, तिचा विजयाचा आलेख आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी उंचावेल आणि ती देशासाठी ऑलिम्पिक पदकाचे स्वप्नही पूर्ण करू शकेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
तिच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक, सचिव दत्ता आफळे, जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्यासह जिल्ह्यातील अनेक क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी तिचे अभिनंदन करून राष्ट्रकुल स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.