छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. या प्रसंगी असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी मावळत्या कार्यकारिणीचे आभार मानत, शहरात क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी आणि क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाला माजी उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष पारस छाजेड, माजी कोषाध्यक्ष सुभाष पटेल, नवनिर्वाचित उपाध्यक्ष सचिन मुळे, उपाध्यक्ष उमेश डबरी, नवनिर्वाचित सचिव शिरीष बोराळकर, नवनिर्वाचित सहसचिव करण डोगरा आणि कोषाध्यक्ष अनिल इरावणे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य सुधीर भालेराव, सुयोग माछर, निखिल मिटकर, हेमंत मुळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. नवनिर्वाचित सदस्य सुशील वकील हे बाहेरगावी असल्याने या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत.

या कार्यक्रमास किरण जोशी, जुगलकिशोर तापडिया, मोहन बोंबले, अनिल अहिरवाडकर, विशाल पांडे, अरुण गुदगे, विकास लोळगे, इक्बाल सिद्दिकी, अजित मुळे, मोहन बोरा, वसंत शर्मा, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अनिल मकरिये, सुभाष अत्री, सचिन अत्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्षांनी सिडकोच्या सहकार्यामुळे मिळालेल्या जागेचा आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

भविष्यातील नियोजनावर भर
असोसिएशनच्या आगामी वाटचालीबद्दल बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल सावे यांनी स्पष्ट केले की, येत्या १५ दिवसांत सर्व सदस्यांची एक विशेष बैठक बोलावली जाईल. या बैठकीच्या माध्यमातून सर्वांच्या सूचना लेखी स्वरूपात घेऊन एक निश्चित आराखडा (अजेंडा) तयार केला जाईल. यामध्ये खेळाडूंचा सहभाग वाढवणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि मैदान विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणे या गोष्टींना प्राधान्य दिले जाईल.

छत्रपती संभाजीनगर असोसिएशनकडे स्वतःचे मैदान असल्याचा अभिमान व्यक्त करत, या मैदानाचे रूपांतर एका उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाच्या स्टेडियममध्ये करण्यासाठी संपूर्ण टीम एकत्र येऊन काम करेल, असा विश्वास अतुल सावे यांनी शेवटी व्यक्त केला. मावळत्या समितीने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

क्रिकेटच्या विकासासाठी सावे यांचे नेतृत्व महत्त्वाचे - बोराळकर

कार्यक्रमात बोलताना सचिव शिरीष बोराळकर यांनी नमूद केले की, अतुल सावे यांनी अध्यक्षपद स्वीकारावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. सावे हे मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री असल्याने त्यांच्या अनुभवाचा व पदाचा थेट फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना आणि क्रिकेटच्या विकासाला होईल. यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत काही मतभेद झाले असले, तरी ते घरातील वादळासारखे होते आणि आता सर्व वाद मिटून संपूर्ण टीम एकत्र आली आहे.

क्रिकेट मैदानाचे होणार आधुनिकीकरण
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले 'एन २' क्रिकेट मैदान हे जवळपास ९ एकर परिसरात पसरलेले आहे. या मैदानासाठी पूर्वी सुभाष लोळगे साहेब, जे. यू. मिटकर आणि किरण जोशी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. आता अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली ही नवीन टीम या मैदानाचा अधिक विकास करून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा विश्वास सचिव शिरीष बोराळकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला. शेवटी, उत्कृष्ट नियोजनाबद्दल नवनिर्वाचित सचिवांनी सर्वांचे आभार मानले.

असोसिएशनची भक्कम आर्थिक स्थिती
माजी कोषाध्यक्ष सुभाष पटेल यांनी आपल्या मनोगतात असोसिएशनच्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेतला. पूर्वी न्यायालयाच्या आदेशांमुळे काही अडचणी आणि निर्बंध आले होते, तरीही समितीने अत्यंत कार्यक्षमतेने कामकाज चालवले, असे त्यांनी नमूद केले. सध्या असोसिएशनची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम असून, बँकेत ३० लाख रुपयांच्या ठेवी (एफडी) सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक वाटचाल आणि पुढील दिशा:
कार्यक्रमात ज्येष्ठ मार्गदर्शक नरेंद्र पाटील यांनी असोसिएशनच्या १९६२ पासूनच्या ऐतिहासिक प्रवासाला उजाळा दिला. नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, १९७३ मध्ये पहिली 'अॅरिस्टो ट्रॉफी' सुरू करून शहरातील क्रिकेटला गती देण्यात आली होती. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात व शोरूममध्ये बैठका घ्याव्या लागल्या; परंतु सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने असोसिएशन आज या स्तरावर पोहोचली आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांच्या दूरदृष्टीमुळे आगामी काळात जिल्ह्यातील क्रिकेटला नक्कीच चांगले दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी, मावळत्या समितीने सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी सचिव आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष सचिन मुळे यांनी प्रास्ताविक करुन जुन्या कार्यकारिणीचे योगदान सांगत नव्या कार्यकारिणी पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन स्वागत केले. खजिनदार अनिल इरावणे यांनी आभार व्यक्त केले.