छत्रपती संभाजीनगर ः पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित इंडिया तायक्वांदो आणि कुक्कीवॉन ब्लॅक बेल्ट परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या दोन खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेत रुद्र पांडे आणि अर्पित यादव यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत ‘ब्लॅक बेल्ट’चा बहुमान पटकावला. विशेष म्हणजे, रुद्र पांडे हा पॅरा तायक्वांदो खेळाडू असून, वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी हा बहुमान मिळवणारा तो महाराष्ट्रातील सर्वात युवा पॅरा तायक्वांदोपटू ठरला आहे.

दोन्ही खेळाडूंनी कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध सरावाच्या जोरावर हे यश मिळविले. त्यांना प्रशिक्षक डॉ. प्रसाद कुलकर्णी आणि संकेत व्यवहारे यांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.

या ऐतिहासिक यशाबद्दल जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा सानप, सचिव डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. रत्नदीप देशमुख, राजेश सातोनकर आणि नारायण भालेराव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले. जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रुद्र आणि अर्पितच्या या कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून नवोदित खेळाडूंना यातून मोठी प्रेरणा मिळणार आहे.